तुळजाभवानीच्या मंदिराची रचना
तुळजाभवानीच्या मंदिराची रचना
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो. हा कळस पंचधातूपासून बनविला आहे. चौघडयाच्या पायऱ्या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो. देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त आंगण, ओवऱ्या व दगडी तट आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला एक होमकुंड आहे व त्यावर शिखर बांधले आहे. देवीचे मुख्य मंदिर एका दरीत वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील मंडप सोळखांबी मंडपाच्या तत्वावर आधारलेला आहे. पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
मंदिराच्या रचनेचे एक अनोखे वैशिष्ट्य
गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते (असे इतरत्र आढ्ळत नाही).
सभामंड्प ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती, शंकराचे स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह, श्रीखंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.
Comments
Post a Comment